Friday, August 19, 2011

ये रे घना, ये रे घना

ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना

फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना

गीतकार: आरती प्रभू
गायक: आशा भोसले
संगीतकार: पं. हृदयनाथ मंगेशकर

अप्सरा आली

कोमल काया की मोहमाया पुनव चांदणं न्हाले
सोन्यात सजले, रुप्यात भिजले रत्नप्रभा तनु ल्याले
ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहून थिजली इन्द्रसभा भवताली

अप्सरा आली इन्द्रपुरी तुन खाली
पसरली लाली रत्नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदणी रंगमहाली
अप्सरा आली पुनव चांदणं न्हाली

छबीदार सुरत देखणी जणू हिरकणी नार गुलझार
सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसती भार
शेलटी खुणावी कटी तशी हनुवटी नयन तलवार

ही रती मदभरली नारी ठिणगी शिणगाराची
कस्तुरी दरवळली दारी झुळूक ही वाऱ्याची
ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहून थिजली इन्द्रसभा भवताली

अप्सरा आली इन्द्रपुरी तुन खाली
पसरली लाली रत्नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदणी रंगमहाली
अप्सरा आली पुनव चांदणं न्हाली

गीत: गुरु ठाकूर 
संगीत: अजय - अतुल 
गायक: बेला शेंडे, अजय - अतुल 

Thursday, August 18, 2011

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे


या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ?
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते
नदिच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

या ओठांनी चुंबुनि घेइन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : यशवंत देव
स्वर : अरुण दाते

कसे सरतील सये...

कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळिमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना,
गुलाबाची फुलं दोन...

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फुलं दोन...

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझ्यातुझ्या तुझीतुझी तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना,
गुलाबाची फुलं दोन...

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया अबोलीची फुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरु दे ना वारा गुदमरु दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना,

गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

गीत: संदीप खरे

हे भलते अवघड असते

हे भलते अवघड असते

गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना

का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला

हे भलते अवघड असते... हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे... ते दूर दूर जाताना...
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यातील अडवून पाणी... हुंदका रोखुनी कंठी...
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते...

तरी असतो पकडायाचा... हातात रुमाल गुलाबी...
वार्‍यावर फडकवताना... पाह्यची चालती गाडी...
ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली...
गजरा माळावा इतुके... ती सहज अलविदा म्हणते...

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू...
इतक्यात म्हणे ती - माझ्या कधी गावा येशील का तू?
ती सहजच म्हणुनी जाते... मग सहजच हळवी होते...
गजर्‍यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते...

कळते की गेली वेळ... ना आता सुटणे गाठ...
आपुल्याच मनातील स्वप्ने... घेऊन मिटावी मूठ...
ही मूठ उघडण्यापूर्वी... चल निघुया पाऊल म्हणते...
पण पाऊल निघण्यापूर्वी... गाडीच अचानक निघते...

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी...
ओठावर शीळ दिवाणी... बेफिकीर पण थरथरती...
पण क्षण क्षण वाढत असते... अंतर हे तुमच्यामधले...
मित्रांशी हसतानाही... हे दु:ख चरचरत असते...

हे भलते अवघड असते….

गीत : संदीप खरे 

गणराज रंगी नाचतो


गणराज रंगी नाचतो, नाचतो,
पायी घागर्‍या, करिती रुणझुणु,
नाद स्वर्गी पोचतो ||धृ||

कटी पीतांबर कसून भरजरी,
बाल गजानन नर्तनास करी,
तुंदिल तनु, तरी चपल साजिरी,  
लावण्ये साजतो ||१||

नारद तुंबरू, करिती गायन,
करी शारदा, वीणावादन,
ब्रह्मा धरितो, तालही रंगुन,  
मृदुंग धीमि वाजतो ||२||

देवसभा घनदाट बैसली,
नॄत्यगायने मने हर्षली,
गौरीसंगे स्वये सदाशिव,
शिशुकौतुक पाह्तो ||३||

गीत : शांता शेळके.
संगीत : हृदयनाथ मंगेशकर.
गायिका :लता मंगेशकर.

Thursday, August 11, 2011

स्वयें श्री रामप्रभू ऐकती...||

स्वयें श्रीरामप्रभू ऐकती
कुश लव रामायण गाती

कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतिनें तेजाची आरती

राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनींचे
वाल्मीकींच्या भाव मनींचे
मानवी रूपें आकारती

ते प्रतिभेच्या आम्रवनांतील
वसंत-वैभव-गाते कोकिल
बालस्वरांनी करुनी किलबिल
गायनें ऋतुराज भारिती

फुलांपरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनीं झुलती
कर्णभुषणें कुंडल डुलती
संगती वीणा झंकारिती

सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी
यज्ञ-मंडपीं आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती

गीतकार : ग. दि. माडगूळकर
संगीतकार : सुधीर फडके

सांग सांग भोलानाथ


सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥

भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय
लाडू हळुच घेताना आवाज होई काय
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥१॥

भोलानाथ ! भोलानाथ !! खरं सांग एकदा
आवठवड्यात रविवार येतील कां रे तीनदा
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥२॥

भोलानाथ ! उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल करे ढोपर
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥३॥

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय

गीतकार : मंगेश पाडगावकर
गायक : योगेश खडीकर

Wednesday, August 3, 2011

नागपंचमीची कहाणी


ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पांच सुना होत्या. चातुर्मास्यांत श्रावणमास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळीं, कोणी आपल्या पणजोळी, कोणी माहेरीं, अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीचं नव्हतं. तेव्हां ती जरा खिन्न झाली व मनांत माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून, नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल, असं म्हणूं लागली. इतक्यांत काय झालं? शेषभगवानास तिचीं करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला. त्या मुलीला नेण्याकरितां आला. ब्राह्मण विचारांत पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला? व आतांच कुठून आला? पुढें त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच माझा मामा असं सांगितलंः ब्राह्मणानं तिची रवानगी केलीं. त्या वेषधारी मामानं तिला आपल्या वारुळांत नेलं, खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवा बसवून आपल्या बिळांत घेऊन गेला. आपल्या बायकांमुलांना ताकीद दिली कीं, हिला कोणीं चावूं नका.

एके दिवशीं नागाची नागीण बाळंत होऊं लागली, तेव्हां हिला हातांत दिवा धरायला सांगितलं. पुढं ती व्याली, तिचीं पिलं वळवळ करूं लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातांतला दिवा खालीं पडला. पोरांची शेपूटं भाजलीं. नागीण रागावली. तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली, तो म्हणाला, "तिला लौकरच सासरीं पोंचवूं." पुढं तीं पूर्ववत आनंदानं वागूं लागलीं. एके दिवशीं मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरीं पावती केली. नागाचीं पोरं मोठीं झालीं. आपल्या आईपाशीं चौकशी केली. आमचीं शेपूटं कशानं तुटलीं? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यास फार राग आला, त्याचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरीं आले. नागपंचमीचा दिवस. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहींत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्रं काढलीं. त्यांची पूजा केली. जवळ नागांना, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांचीं पिलं पहात होतीं. सरतेशेवटीं तिनं देवाची प्रार्थना केली. "जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत." असं म्हणुन नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार त्यांनीं पाहून मनांतील सर्व राग घालविला. मनांत तिजविषयीं दया आली. पुढं त्या दिवशीं तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यांत पहांटेस एक नवरत्नांचा हाअ ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशीं तिनं हार उचलून गळ्यांत घातला.

तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला, तसा तुम्हांआम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण!

Monday, August 1, 2011

मंगळागौरीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला कांहीं मुलगा नव्हता. त्याच्या घरीं एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असें म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. “दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी भिक्षा झोळींत घातली. बोवाचा नेम मोडल. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाहीं असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणालें, “आपल्या नवऱ्याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.” असं बोलून बोवा चालता झाला. तिअं आपल्या पतीला सांगितलं. वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणल. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आंत देवीची मूर्ती आहे. मनोभावें पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “घरंदारं आहे, गुरंढोरं आहेत. धन द्रव्य आहे; पोटीं पुत्र नाहीं, म्हणून दुःखी आहे.” देवी म्हणाली, “तुला संततीचं सुख नाहीं, मी प्रसन्न झालें आहे तर तुला देतें. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तें मागून घे.” त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपति आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे, गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरीं जाऊन बायकोला खाऊं घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली.

वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; मोटभर घरीं नेण्याकरितां घेतले. खालीं उतरून पाहूं लागला, तों आपल्या मोटेंत आंबा एकच आहे. असं चार पांच वेळां झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबीं एकच फळ आहे.” फळ घेऊन घरीं आला, बायकोला खाऊं घातलं, ती गरोदर राहिली. दिवसमासां गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासां वाढूं लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाहीं असा माझा नवस आहे. असा जबाब दिला. कांहीं दिवसांनीं मामाबरोबा यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊं लागले. जातां जातां काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं कांहीं मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगई होती, तिला दुसरी मुलगी म्हणूं लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे! तेव्हां ती मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करतए, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाहीं. मग मी तर तिची मुलगी आहे.” हें भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनांत आलं हिच्याशीं भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हें घडतं कसं? त्याच दिवशीं तिथं त्यांनीं मुक्काम केला.

इकडे काय झालं? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करूं, म्हणून धर्मशाळा पाहूं लागले. मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं. उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोंपीं गेलीं. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अग अग मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यांत शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळीं उठून आईला तें वाण दे.” तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. कांहीं वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणूं लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली आंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिऱ्हाडीं गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले.

दुसरे दिवशीं काय झालं? हिनं सकाळीं उठऊन स्नान केलं, आपल्या आईल वाण दिलं. आई उघडून पाहूं लागली, तों आंत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडपांत आला. मुलीला खेळयला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाहीं. मी त्याचे बरोबर खेळत नाहीं.” रात्रींची लाडवांची व आंगठीची खूण कांहीं पटेना. आईबापांणा पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सांपडतो? नंतर त्यांनीं अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं, आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेंकडों लोक येऊन जेवूं लागले.

इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगूं लागला, “मला असं असं स्वप्न पडलं.” मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझावरचं विघ्न टळलं. उद्यां आपण घरीं जाऊं.” परत येऊं लागले. लग्नाच्या गांवीं आले. तळ्यावर स्वयंपाक करूं लागले. दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाहीं.” दासींनीं यजमानणीस सांगितलं. त्यांनीं पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं आंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वांचल,” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असतां. ही सगळी तिची कृपा.” सासर माहेरचीं घरचींदारचीं माणसं सर्व एकत्र झाली, आणि त्या व्रताचं उद्यापन केलं.

तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरईं सुफळ संपूर्ण.