Sunday, June 12, 2011

वटसावित्री / वटपौर्णिमेची कथा :

भद्र देशाचा राजा अश्वपी. त्याची एकुलती एक कन्या सावित्री. ती रूपसंपन्न व सद्‍गुणी मुलगी होती. ती उपवर झाली तेव्हा राजाने तिला, 'तू इच्छेप्रमाणे पतीची निवड कर' - असे सांगितले तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजपुत्राला वरले. सत्यावानाचा पिता द्युमत्सेन हा आंधळा व राज्यभ्रष्ट होता. म्हणून आपल्या परिवारासह तो अरण्यात राहत असे.
सत्यवान शूर व रूपवान असला तरी तो अल्पायुषी आहे हे देवर्षी नारदांना ठाऊक होते. म्हणून त्यांनी व अश्वपती राजाने सावित्रीला दुसर्‍या वराची निवड करण्यास सांगितले, परंतु 'ज्याला मी मनापासून वरले आहे त्याच्याहून दुसर्‍या पुरूषाचा मी विचारही करणार नाही,' असे सावित्रीने निश्चयपूर्वक सांगिलते व सत्यवानाशीच विवाह केला.
काही काळ लोटल्यावर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला. तो पौर्णिमेचा दिवस होता, तेव्हा सावित्रीही त्याच्याबरोबर गेली. कारण नारद मुनींच्या सांगण्यावरून सत्यवानाच्या मृत्यूचा हा दिवस आहे ते दिला ठाऊक होते.
लाकडे फोडून झाल्यावर ‍अतिश्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली. म्हणून एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून तो झोपला. थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी स्वत: यम तेथे आला. सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला. क्षणभरातच सत्यवानाचे प्राण हरण करून यम जाऊ लागला, तशी सावित्रीही त्याच्यामागून निघाली. यमाने तिची समजूत घालून, तिला परत जाण्यास सांगितले. तेव्हा सावित्रीने यमाची स्तुती करून पतिव्रतेच्या कोमल भावना, तिची पतिनिष्ठा व कर्तव्य यासंबंधी सुसंवाद व विद्वत्तापूर्ण विवेचन केले.
तिच्या वाक्चातुर्याने यम प्रसन्न झाला आणि त्याने तिला चार वर देऊ केले, तेव्हा सावित्रीने त्याच्याकडून पहिल्या वराने श्वशुराला दृष्टी, दुसर्‍या वराने त्याला राज्यप्राप्ती, तिसर्‍या वराने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ आणि चौथ्या वराने पतीचे-सत्यवानाचे प्राण मागून घेतले. अशा प्रकारे पतिव्रत्याच्या बळावर सावित्रीने पतिकुळाचा व पितृकुळाचा उद्धार केला आणि स्वत:च्या दिव्य, अलौकिक गुणांमुळे ती जगात अजरामर झाली.

पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली घडलेल्या या गोष्टीमुळे याच दिवसाला आपण वटपोर्णिमा असे म्हणतो. 

1 comment: