Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Tuesday, February 19, 2013

नसती उठाठेव


मोठे होते झाड वाकडे,
तिथे खेळती दोन माकडे
गंमत झाली भारी बाबा,
गंमत झाली भारी

खरखर खरखर सुतारकाका,
कापीत होते एक ओंडका
भुरभुर भुरभुर भुसा उडाला,
माकड मज्जा पाहू लागला

निम्मे लाकूड चिरुन झाले,
दुपार होता काम थांबले
पाचर ठोकून सुतार गेले,
खावयास भाकरी

माकड टुणकन खाली आले,
पाचर हलवूनी काढु लागले
शहाणे दुसरे त्यास बोलले,
धोक्याचे हे काम न आपुले

पहिले आपला हट्ट न सोडी,
जोर लावूनी पाचर काढी
फटित अडके शेपूट तेव्हा,
माकड हाका मारी

उठाठेव ही नसती सारी,
सुतार त्याला फटके मारी
म्हणून करावा विचार आधी,
नंतर कामे सारी

-

Monday, June 18, 2012

पैठणी


फडताळात एक गाठोडे आहे; त्याच्या तळाशी अगदी खाली
जीथे आहते जुने कपडे, कुंच्या, टोपडी शेले शाली

त्यातच आहे घडी करुन जपनू ठेवलेली एक पैठणी
नारली पदर, जरी चौकडी, रंग तीचा सुंदर धानी.

माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती
पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरुन हाती

पैठनीचया अवती भवती दरवळणारा सुक्ष्म वास,
ओळखीची ..अनोळखीची ..जाणीव गूढ़ आहे त्यास.

धुप.. कापूर..उदबत्यातून जलत गेले कीती श्रावण
पैठनीने या जपले एक तन एक मन ..

खस-हीन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची, चमेलीची आरास पदाआडून हसली

वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा स्त्राव झाला,
नवा कोरा कडक पोत एक मउपणा ल्याला

पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलघडत गेले
अहेवपणी मरण आले, माझ्या आजीचे सोने झाले.

कधीतरी ही पठैणी मी धरते उरी कवळून
मऊ-रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून

मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकडानो आजीला माझे कुशल सांगा....

शांता शेळके

Tuesday, December 27, 2011

आम्ही कोण?


आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया -
सौंदर्यातीशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!

शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनीया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!

आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!

- केशवसुत

वेडात मराठे वीर दौडले सात

म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात निमिषात

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी
गदीर्त लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा
ओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वार्यावर गात

निश्चयाचा महामेरु

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी

नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा

आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी

धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले

देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली

या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे

कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा.

Wednesday, November 9, 2011

अरे संसार संसार

 
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं

अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे

ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार

देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !

अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार

असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !

- बहिणाबाई चौधरी

Monday, October 24, 2011

अरे खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरनीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला..

पिलं निजले खोप्यात
जसा झूलता बंगला
तिचा पिलामधि जीव
जीव झाडाले टांगला..!

सुगरिन सुगरिन
अशी माझी रे चतुर
तिले जल्माचा सांगाती
मिये गन्यागम्प्या नर

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा !

तिची उलूशीच चोच,
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं ?

- बहीणाबाई चौधरी

Thursday, September 22, 2011

आनंदी आनंद गडे

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे...... आनंदी आनंद गडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे...... आनंदी आनंद गडे

नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनी हे पाहतसे
कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे...... आनंदी आनंद गडे

वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजीत रे, कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे...... आनंदी आनंद गडे

स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनी स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे...... आनंदी आनंद गडे

- बालकवी

ती फ़ुलराणी...


हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती, फ़ुलराणी ही खेळत होती
गोड निळ्या वातावरणात, अव्याज मने होती डोलत
प्रणयचंचल त्या भृलीला, अवगत नव्ह्त्या कुमारीकेला
आईच्या मांडीवर बसुनी, झोके घ्यावे गावी गाणी
याहुनी ठावे काय तियेला, साध्या भोळ्या फ़ुलराणीला?

पूरा विनोदी संध्यावात, डोल दोलवी हिरवे शेत
तोच एकदा हासत आला, चुंबून म्हणे फ़ुलराणीला
"छानी माझी सोनुकली ती, कुणाकडे गं पहात होती?
कोण बरे त्या संध्येतुन, हळूच पहाते डोकावून?
तो रविकर का गोजिरवाणा, आवडला आमुच्या राणीला?"
लाज लाजली ह्या वचनांनी, साधी भोळी ती फ़ुलराणी

आंदोळी संध्येच्या बसूनी, झोके झोके घेते रजनी
त्या रजनीचे नेत्र विलोल, नभी चमकती ते ग्रहगोल
जादू टॊणा त्यांनी केला, चैन पडेना फ़ुलराणीला
निजली शेते निजले रान, निजले प्राणी थोर लहान
अजून जागी फ़ुलराणी ही, आज कशी ताळ्यावर नाही?
लागेना डोळ्याशी डोळा, काय जाहले फ़ुलराणीला

या कुंजातून त्या कूंजातून, इवल्या इवल्या दिवट्या लावून
मध्यरात्रीच्या निवांत समयी, खेळ खेळते वनराणी ही
त्या देवीला ओव्या सुंदर, निर्झर गातो त्या तालावर
झुलुनी राहिले सगळे रान, स्वप्नसंगमी दंग होऊन
प्रणय चींतनी विलीन वॄत्ती, कुमारिका ही डोलत होती
डुलता डुलता गुंग होऊनी, स्वप्ने पाही मग फ़ुलराणी

कुणी कुणाला अवकाशांत, प्रणयगायनें हॊतें गात;
हळूच मागुनी आले कॊण, कुणी कुणा दे चुंबनदान?”
प्रणय खेळ हे पाहुन चित्तीं, विरहार्ता फुलराणी हॊती;
तॊं व्यॊमींच्या प्रेमदेवता, वार्‍यावरती फिरतां फिरतां-
हळूच आल्या उतरुन खालीं, फुलराणीसह करण्या खेळी.
परस्परांना खुणवुनी नयनीं, त्या वदल्या ही अमुची राणी?

स्वर्भुमीचा जुळवीत हात, नाच नाचतो प्रभात वात
खेळूनी दमल्या त्या घ्रह माला, हळुच लागती लपावयाला
आकाशाची गंभिर शांती, मंद मंद ये अवनी वरती
विरू लागले संशय जाल, संपत ये विरहाचा काल
शुभ्र धुक्ल्याचे वस्त्र लेऊनी, हर्षनिर्भरा नटली अवनी
स्वप्नसंगमी रंगत होती, तरीही अजुनी फ़ुलराणी ती,
तेजोमय नव मंडप केला, लक्ख पांढरा दाही दिशांना,
जिकडे तिकडे उधळीत मोती, दिव्य वर्‍हाडी गगनी येती,
ला सुवर्णी झगे घालूनी, हासत हासत आले कोणी,
कुणी बांधीला गुलाबी फ़ेटा, झगमगणारा सुंदर मोठा,
आकाशी चंडोल चालला, हा वाड्निश्चय करावयाला,
हे थाटाचे लग्न कुणाचे, साध्या भोळ्या फ़ुलराणीचे,

गाऊ लागले मंगल पाठ, सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवी सनई मारुत राणा, कोकिळ घे तानावर ताना,
नाचू लागले भारद्वाज, वाजवीती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर, नवरी ही फ़ुलराणी सुंदर,
लग्न लागते सावध सारे, सावध पक्षी सावध वारे,
दवमय अंत:पट फ़िटला, भेटे रविकर फ़ुलराणीला,

वधू वरांना दिव्य रवानी, कुणी गायीली मंगल गाणी,
त्यात कुणीसे गुंफित होते, परस्परांचे प्रेम अहा ते,
आणिक तेथील वनदेवीही, दीव्य आपुल्या उच्छ्वासांनी,
लिहीत होत्या वातावरणी, फ़ुलराणीची गोड कहाणी,
गुंगत गुंगत कवी त्या ठायी, स्फ़ुर्ती सह विहराया जाई,
त्याने तर अभिषेकच केला, नवगीतांनी फ़ुलराणीला,

- बालकवी

Wednesday, September 21, 2011

जिंकू किंवा मरू

माणुसकीच्या शत्रुऊसंगे, युद्ध आमुचे सरू
जिंकू किंवा मरू

लढतिल सैनिक, लढू नागरिक, लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू

हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू, जिंकू किंवा मरू

गीत - ग. दि. माडगूळकर

जयोस्तुते


जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्रीस्वतंत्रते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

- स्वातंत्र्यवीर सावरकर

सर्वात्मका शिवसुंदरा

सर्वात्मका, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ॥ धृ. ॥

सुमनांत तू, गगनांत तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
सर्वांत त्या वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ॥ १ ॥

श्रमतोस तू शेतामध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थावीना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना ॥ २ ॥

करुणाकरा करुणा तुझी
असता मला भय कोठले?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना ॥ ३ ॥

- कुसुमाग्रज

Monday, September 19, 2011

खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे

सावळ्या:
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !
कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे
शीव ही ओलांडून तीरसे ?
लगाम खेचा या घोडीचा रावं टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणी !
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेऊ ही
मला का ओळखले हो तुम्ही ?
हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे
हे हाड ही माझे लेचेपेचे नसे
या नसानसातून हिंमत बाजी वसे
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

स्वार:
मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी भरावे तुवा
कशाला ताठा तुज हा हवा ?
मुठीत ज्याच्या मूठ असे ही खड्गाची तो बरे
वीर तू समजलास काय रे ?
थोर मारिती अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव भाला बरची तरी ?
हे खड्गाचे बघ पाते किती चमकते
अणकुचीदार अती भाल्याचे टोक ते
या पुढे तुझी वद हिंमत का राहते ?
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

सावळ्या:
आपण मोठे दाढीवाले अहा शूर वीर की --
किती ते आम्हाला ठाऊकी !
तडफ आमुच्या शिवबाची तुम्हा माहिती न का?
दाविती फुशारकी का फुका ?
तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी --
आमुच्या शिवबाने भर रणी
मी असे इमानी चेला त्यांचे कडे
हुकुमावीण त्यांच्या समजा याचे पुढे
देई न जाऊ मी शूर वीर फाकडे
पुन्हा सांगतो
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

लाल भडक ते वदन जाहले बाळाचे मग कसे
स्वार परि मनी हळू का हसे ?
त्या बाळाचे नयनी चमके पाणी त्वेषामुळे
स्वार परि सौम्य दृष्टीने खुले
चंद्र दिसे जणू एक, दुसरा तपतो रवि का तर
ऐका शिवबाचे हे स्वर --
आहेस इमानी माझा चेला खरा
चल इमान घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा
"खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !"

- वा.भा. पाठक

Sunday, September 18, 2011

तेथे कर माझे जुळती

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येऊनिया जाती
जग ज्यांची न करी गणती ॥१॥

यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाहि पणती ॥२॥

जिथे विपत्ती जाळी उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥३॥

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांगी डोळे भरती ॥४॥

गीतकार : बा. भ. बोरकर

माझ्या गोव्याच्या भूमीत

माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे||

माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास,
फ़ुली फळान्चे पाझर
कळी फ़ुलांचे सुवास||

माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी||

माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफ़ा पानाविण फ़ुले,
भोळा भाबडा शालीन
भाव शब्दाविण बोले||

माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात||

माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी||

- बा. भ. बोरकर

झुक झुक झुक झुक अगीनगाडी

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुनी घेऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया

- ग.दि. माडगूळकर

टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले

टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर‌ भिर‌ भिर‌ त्या तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !

दूर दूर हे सूर वाहती
उन्हात पिवळ्या पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले !

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनी सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

- मंगेश पाडगांवकर

Wednesday, September 14, 2011

गवाताच पातं

गवाताच पातं वार्‍यावर डोलतं
डोलतान म्हणतं खेळायला चला ||ध्रु||

झर्‍यातलं पाणी खळ खळा हसतं
हसताना म्हणतं खेळायला चला
निळं निळं पाखरू आंब्यावर गातं
गाताना म्हणतं नाचायला चला ||१||

झिम्मड पावसात गारांची बरसात
बरसात म्हणते वेचायला चला
छोटासा मोती लपाछपी खेळतो
धावताना म्हणतो शिवायाला चला ||२||

मनिच पिल्लू पायाशी लोळतं
लोळतान म्हणतं जेवायला चला
अहो,जेवायला चला
तुम्ही जेवायला चला ||३||

- कुसुमाग्रज

फुलपांखरूं

फुलपांखरूं !
छान किती दिसतें । फुलपाखरूं

या वेलीवर । फुलांबरोबर
गोड किती हसतें । फुलपांखरूं

पंख चिमुकलें । निळेजांभळे
हालवुनी झुलतें । फुलपांखरूं

डोळे बरिक । करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते । फुलपांखरूं

मी धरुं जाता । येई न हाता
दूरच तें उडते । फुलपांखरूं

- ग.ह. पाटील

Thursday, May 19, 2011

सागरा प्राण तळमळला...


सागरा प्राण तळमळला
ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विराहशंकीताही झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ...

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...

या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनी का आंग्ल भूमी ते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासना ते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला ...

कवी - विनायक दामोदर सावरकर