Showing posts with label पाऊस गीत. Show all posts
Showing posts with label पाऊस गीत. Show all posts

Tuesday, October 4, 2011

वारा गाई गाणे

वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फुल पाने

रंग हे नवे, गंध हे नवे
स्वप्न लोचनी वाटते हवे
हा निसर्ग भासे, विश्वरुप लेणे

या निळया नभी, मेघ सावळे
कल्पनेस मी पंख लाविले
झेलते पिसावरी, हे सतेज सोने

आज वेड हे कुणी लाविले ?
अंतराळी का पडती पाऊले ?
कशी सोडवू मी सुखाचे उखाणे ?

गीतकार - जगदीश खेबुडकर
गायक - लता मंगेशकर
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट - संसार

आई मला पावसांत जाउं दे

आई मला पावसांत जाउं दे
एकदाच ग भिजुनी मजला चिंब चिंब होउं दे

मेघ कसे हे गडगड करिती
विजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणांत मज खुप खुप नाचुं दे

खिडकीखाली तळें साचलें
गुडघ्याइतके पाणी भरलें
तर्हेतर्हेच्या होड्यांवृची मज शर्यत ग लावुं दे

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करुं दे

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप खोकला शिंका सर्दी वाट्टेल ते होउं दे

गीतकार - वंदना विटनकर

घन ओथंबून येती

घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती
पंखा वरती सर ओघळती, झाडांतून झडझडती

घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती
डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती

घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले
आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबिला घन होऊन बिलगला

गीतकार - ना. धो. महानोर
गायक - लता मंगेशकर
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर

Wednesday, September 7, 2011

नाच रे मोरा

नाच रे मोरा , अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच ।

ढगांशि वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी , वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच ।

झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ , काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच ।

थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत , खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच ।

पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझि माझि जोडी जमली रे
आभाळात छान छान , सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच ।

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर - आशा भोसले

Wednesday, June 29, 2011

झाडाखाली बसलेले - गारवा

झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले

वार्‍यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला
गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले

पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा
होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले

काही कळया, काही फूले, काही झूले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले

गीत: मिलिंग इंगळे

Thursday, June 2, 2011

येरे येरे पावसा

येरे येरे पावसा, 
तुला देतो पैसा

पैसा झाला खोटा,
पाऊस आला मोठा

ये ग ये ग सरी,
माझे मडके भरी

सर आली धावून,
मडके गेले वाहून...  

तुझ्या माझ्यासवे...


तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोचायचा पाऊसही,

पडे ना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही,

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही,

मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कशा युक्त्या मला सुचवायचा पाऊसही,

कशी भर पावसात आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही,

आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊस ही...

गीत - संदीप खरे
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर - सलील कुलकर्णी