Monday, June 6, 2011

सप्तपदी ही रोज चालते...


सप्तपदी ही रोज चालते, तुझ्या सवेते
शतजन्मीचे हो माझे नाते

हळव्या तुझिया करात देता
करांगुळी ही रुप गोजिरी
गोड शिरशिरी उरांत फुलता
स्पर्शाने जे मुग्ध बोलते

करकमळाच्या देठाभवती
झिम्मा खेळत प्रीत बिलवरी
दृष्ट लाजरी जरीकाठी ती
तुझ्या लोचने वळूनी बघते

आठवे पाऊल प्रीत मंदिरी
अर्धांगी मी सगुण साजिरी
मूर्त होता तुझ्या शरीरी
अद्वैताचे दैवत होते

गायिका - लता मंगेशकर
गीतकार - पी. सावळाराम
संगीतकार - वसंत प्रभू

दृष्ट लागण्या जोगे सारे...


 
दृष्ट लागण्या जोगे सारे
गालबोट हि कुठे नसे
जग दोघांचे असे रचु कि
स्वर्ग त्या पुढे फ़िका पडे ॥धृ॥
स्वप्नाहुन सुंदर घरटे
मनाहुन असेल मोठे
दोघानाहि जे जे हवे ते
होइल साकर येथे ॥१॥
आनंदाची अन तृप्तीची
शांत सावली येथे मिळे
जग दोघांचे असे रचु कि
स्वर्ग त्या पुढे फ़िका पडे ॥२॥
जुळली रे नाते अतुट
घडे जन्मा जन्माची भेट
घेऊनीया प्रितीची आण
एकरुप होतील प्राण ॥३॥
सहवासाचा सुंगध येथे
आणि सुगंधा रुप दिसे
जग दोघांचे असे रचु कि
स्वर्ग त्या पुढे फ़िका पडे ॥४॥
दृष्ट लागण्या जोगे सारे
गालबोट हि कुठे नसे
जग दोघांचे असे रचु कि
स्वर्ग त्या पुढे फ़िका पडे ॥धृ॥



गीत - राजेश कुलकर्णी
शब्द - सुहास पै

Thursday, June 2, 2011

येरे येरे पावसा

येरे येरे पावसा, 
तुला देतो पैसा

पैसा झाला खोटा,
पाऊस आला मोठा

ये ग ये ग सरी,
माझे मडके भरी

सर आली धावून,
मडके गेले वाहून...  

तुझ्या माझ्यासवे...


तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोचायचा पाऊसही,

पडे ना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही,

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही,

मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कशा युक्त्या मला सुचवायचा पाऊसही,

कशी भर पावसात आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही,

आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊस ही...

गीत - संदीप खरे
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर - सलील कुलकर्णी

Wednesday, June 1, 2011

सांज ये गोकुळी...

सांज ये गोकुळी, सावळी सावळी
सावळयाची जणू साऊली

धूळ उडिवत गाई निघाल्या
शाम रंगात वाटा बुडाल्या
परतती त्या सवे, पाखरांचे थवे
पैल घंटा घूमे राऊळी

पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे
भोवती सावळया चाहूली

माऊली सांज, अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वार्‍यावरी वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी

गायक - आशा भोसले
गीतकार - सुधीर मोघे
संगीतकार - श्रीधर फडके