Wednesday, June 1, 2011

सांज ये गोकुळी...

सांज ये गोकुळी, सावळी सावळी
सावळयाची जणू साऊली

धूळ उडिवत गाई निघाल्या
शाम रंगात वाटा बुडाल्या
परतती त्या सवे, पाखरांचे थवे
पैल घंटा घूमे राऊळी

पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे
भोवती सावळया चाहूली

माऊली सांज, अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वार्‍यावरी वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी

गायक - आशा भोसले
गीतकार - सुधीर मोघे
संगीतकार - श्रीधर फडके

Thursday, May 19, 2011

जीवनात ही घडी

जीवनात ही घडी अशीच राहु दे
प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नातिल चांदवा जीवास लाभु दे
जीवनात ही घडी अशीच राहु दे

हळुच तुला बघण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविण का अर्थ वेगळा
स्पर्षातुन अंग अंग धुंद होऊ दे
जीवनात ही घडी अशीच राहु दे

पाहु दे असेच तुला नित्य हासता
जाउ दे असाच काळ शब्द झेलता
मीलनात प्रेमगीत धन्य होऊ दे
जीवनात ही घडी अशीच राहु दे

गीत : यशवंत देव
संगीत : यशवंत देव
स्वर : लता मंगेशकर

अखेरचा हा तुला दंडवत...


अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव
दरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव

तुझ्या शिवारी जगले, हसले, कडी कपारी अमृत प्याले
आता हे परि सारे सरले, उरलं मागं नाव

हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता
कुणी ना उरला वाली आता, धरती दे गं ठाव

गायक - लता मंगेशकर
संगीतकार - आनंदघन

राधा ही बावरी...


रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी llधृ.ll

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहावरूनि श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गूज प्रीतीचे गाणे सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ll१ll

आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळति
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरपून जाई
हा चंद्र-चांदणे ढगाआडुनि प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ll२ll

गीत : स्वप्नील बांदोडकर

सागरा प्राण तळमळला...


सागरा प्राण तळमळला
ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विराहशंकीताही झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ...

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...

या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनी का आंग्ल भूमी ते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासना ते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला ...

कवी - विनायक दामोदर सावरकर